अधिकाऱ्यांसाठी जिमखान्यापेक्षा महापौर बंगला उभारावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2018

अधिकाऱ्यांसाठी जिमखान्यापेक्षा महापौर बंगला उभारावा


भाजपाचा सभात्याग -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या महालक्ष्मी येथील मोडकळीस आलेल्या दोन इमारती पाडून अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांसाठी जिमखाना जरुरी नसून महापौरांना पर्यायी बंगला जरुरी आहे. याचा विचार करून याभूखंडावर महापौर बंगला उभारावा अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीत केली. मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपाच्या विरोधानंतरही जिमखान्याचा प्रस्ताव मंजूर केल्याने भाजपाने सभात्याग केला.

महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी येथील केशव खाडे मार्गावर नगर भूमापन क्रमांक ४७/६ वर पालिकेच्या दोन इमारती आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून या इमारती पाडून त्या भूखंडावर अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारला जाणार आहे. याकामासाठी पालिकेच्या दोन मोडकळीस आलेल्या इमारती पाडल्या जाणार आहेत. यासाठी लँडमार्क कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. याकामांसाठी कंत्राटदाराला ४८ कोटी ७५ लाख २४ हजार ७८४ रुपये इतकी रक्कम अदा केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावर भाजपाने जोरदार आक्षेप घेतला. मलबार हिल व राणी बाग येथील बंगले महापौरांसाठी सोयीस्कर नाहीत. सध्या महापौर बंगल्याचा विषय गाजत असल्याने महापौरांसाठी या भूखंडावर बंगला बांधून देण्यात यावा अशी मागणी कोटक यांनी केली. महापौर बंगल्यासाठी हा भूखंड योग्य असून या ठिकाणी पश्चिम, पूर्व आणि शहरातील नागरिक व नगरसेवकांना पोहचणे सहज शक्य असल्याचे कोटक यांनी सांगितले. तर भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी या भूखंडांवरील आरक्षण कधी बदलण्यात आले? प्रशासकीय मंजुरी कधी घेतली? असे प्रश्न उपस्थित केले. १५ महिन्यापूर्वी पुरंदरे स्टेडियमच्या प्रस्तावाला तर एप्रिल महिन्यात तीन जलतरण तलावांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे काम अद्याप सुरु झाले नसल्याने भूखंडाचे आरक्षण बदलून जिमखाना बांधू नये अशी मागणी शिंदे यांनी केली. तर मकरंद नार्वेकर यांनी या भूखंडावर जिमखाना उभारला जावा का याबाबात लोकांचे मत मागवावे अशी मागणी केली. जिमखाना बांधावयाचा असल्यास या भूखंडाचे आरक्षण बदलावे लागणार आहे तसेच सीआरझेडबाबतही मंजुरी घेयावी लागणार आहे. यामुळे सध्या प्रस्तावात दाखवण्यात आलेल्या रक्कमेमध्ये वाढ होणार असल्याने त्याला भाजपाने विरोध केला. तसेच स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्याकडे मतदान घेण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली. दरम्यान यावेळी मतदान घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने जिमखान्याच्या हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. यामुळे संतापलेल्या भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.

Post Bottom Ad